![]()
कोल्हापूर / प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पहाटे १ वाजता अचानक भेट देत रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली.त्यांच्या या अचानक दौर्यामुळे प्रशासनिक यंत्रणा काही काळ दणाणून गेली.दौर्यादरम्यान मंत्री आबिटकर यांनी आपत्कालीन विभागातील उपचार व्यवस्था,स्वच्छता,औषधसाठा,विभागांचे कामकाज,तसेच अत्यावश्यक यंत्रसामग्रीची कार्यस्थिती यांची सखोल माहिती घेतली.त्यांनी थेट रुग्णांशी संवाद साधत उपचारांची गुणवत्ता, उपलब्ध सुविधा आणि सेवा वेळेवर मिळत आहेत का याबाबत विचारपूस केली.रुग्णांच्या समाधानाबाबत ते विशेष संवेदनशील दिसून आले.रुग्णालयातील सेवा आणखी सुधारण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.अधिक सक्षम,तंत्रशुद्ध आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्याबाबत सरकार अत्यंत गंभीर असून,रुग्णालयांच्या कार्यक्षमतेत सातत्याने वाढ करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील,असा विश्वास मंत्री आबिटकर यांनी व्यक्त केला.त्यांच्या या पाहणीमुळे प्रशासन रुग्णसेवेबाबत किती सजग आहे,याची प्रचिती आली.या पाहणीदरम्यान उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषण रामटेके, डॉ. पद्मजा सराफ तसेच इतर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. अचानक केलेल्या या दौर्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये कामकाजाकडे अधिक जबाबदारीने पाहण्याची भावना निर्माण झाली असून आरोग्यसेवेची गुणवत्ता उंचावण्यास याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होणार आहे.
