![]()
बजरंग खामकर यांचे आमदार अशोकराव माने व डॉ. नीता माने यांना खुले आव्हान
जयसिंगपूर : प्रतिनिधी-
शिरोळ तालुका विकास आघाडीच्या प्रचार शुभारंभ सभेत झालेले आरोप–प्रत्यारोप आता थेट संघर्षाच्या पातळीवर पोहोचले आहेत. आमदार अशोकराव माने यांची सून व माजी नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांनी राजीव गांधी नगर परिसरातील मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेची जागा एका माजी नगरसेवकाने विकली आणि त्यातून हॉटेल उभारले असा गंभीर आरोप करत, अशा व्यक्तींना पुन्हा सभागृहात पाठवू नये, अशी मागणी जनतेसमोर केली होती.
या आरोपांवर माजी नगरसेवक बजरंग खामकर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत थेट आमदार अशोकराव माने आणि डॉ. नीता माने यांनाच खुले आव्हान दिले.
“माझा जागेशी संबंध नाही उलट व्यवहार माने गटानेच केला सदर जागेशी माझा तिळमात्रही संबंध नाही. या जागेचे सर्व व्यवहार विद्यमान आमदार माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीच हाताळले. सभासद करून नागरिकांना प्लॉट विकण्याची प्रक्रिया त्यांच्या अधिकाराखालीच चालली होती.”
त्यांनी आरोप केला की, या सर्व व्यवहाराची संपूर्ण माहिती स्वतः आमदार माने यांना असूनही, डॉ. नीता माने ‘अज्ञानातून व आधारहीन आरोप’ करत आहेत.
बजरंग खामकर यांनी आणखी आक्रमक होत जाहीर आव्हान दिले“सासऱ्यांना घेऊन राजीव गांधी नगरमध्ये या. कोण जमिनी विकल्या, कोण पैसे घेतले — याचे दूध-पाणी करू!”
खामकर यांनी पुढे गंभीर दावा केला—
“रत्नाप्पाण्णा कुंभार गृह निर्माण सोसायटीचे सचिव बन्ने आणि राजमाने यांनीच लोकांकडून पैसे घेऊन जमिनी विकल्या आहेत.”
या उल्लेखामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, राजकीय वर्तुळात नवी खळबळ उडाली आहे
खामकरांच्या या आव्हानामुळे जयसिंगपूरातील राजकीय तापमान आणखी भडकले असून, निवडणूक दौऱ्यातील चर्चा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढे कोणते नवे खुलासे समोर येणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

विरोधकांच्या टीकेला मी कामातून उत्तर देणारा माणूस : आमदार यड्रावकर
“जनतेच्या सेवेतूनच ‘मालक’ पदवी मिळाली” – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर“आम्ही लोकांची कामे करून, रोजगाराची संधी निर्माण करून, जनतेच्या गरजा ओळखून सेवा दिली म्हणूनच शिरोळ तालुक्यातील जनता आम्हाला ‘मालक’ म्हणून पदवी देते,” असे जोरदार विधान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
शिरोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला.
“तुमच्याकडे दहा वर्षे खासदारकी होती, पाच वर्षे आमदारकी होती… मग त्या काळात शिरोळ तालुक्यातील जनतेसाठी नेमके काय काम केले?,” असा थेट सवाल करत त्यांनी उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडवली.यड्रावकर म्हणाले की,
“आम्ही सत्तेत आलो ते जनतेचा विश्वास जिंकून. कारण आम्ही लोकांपर्यंत गेलो, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, रोजगाराच्या आणि नोकरीच्या संधी निर्माण केल्या. लोकांना कोण आपला आहे हे कधीच फसवत नाही.”
सभेदरम्यान कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत घोषणा दिल्या. आगामी निवडणुकांची दिशा या वक्तव्यांमुळे अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.