व्ही.एस.आय.चे महासंचालक डॉ. संभाजीराव कडू पाटील यांच्याकडून श्री दत्तच्या क्षारपड मुक्तीच्या कामाची पाहणी आणि कौतुक

Loading

शिरोळ : प्रतिनिधी-
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुण्याचे महासंचालक डॉ. संभाजीराव कडू पाटील यांच्यासह वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कपिल सुशिर, चिप अकाउंटंट शिवाजी खेंगरे यांनी श्री दत्त सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर भेट दिली. त्याच बरोबर उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घालवाड, शिरोळ येथे झालेल्या जमीन क्षारपड मुक्तीच्या कामाची प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली. सच्छिद्र निचरा प्रणाली वापरल्यानंतर तोडणीस आलेल्या ऊस प्लॉटची पाहणी करून त्यांनी क्षारपड मुक्तीच्या कामाचे कौतुकही केले.
प्रारंभी सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार गणपतराव पाटील व कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांच्या हस्ते झाले.
शिरोळ येथे 750 एकरावर झालेल्या जमीन क्षारपड मुक्तीच्या कामाची पाहणी मान्यवरांनी केली. गणपतराव पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील यांनी एकूण 23 गावांमध्ये 10 हजार एकरावरती 210 किलोमीटर मुख्य पाईपलाईन सह 4500 एकरावर अंतर्गत पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले. तसेच हा प्रकल्प 100% यशस्वी कसा झाला आहे याची संपूर्ण माहिती दिली. इंजिनीयर कीर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे यांनी आराखड्यासह सर्व तांत्रिक माहिती सांगितली. क्षारपड मुक्तीच्या कामांमध्ये भाग घेतलेल्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन केले. ज्या जमिनीमध्ये गेल्या 40 ते 50 वर्षापासून कोणतेच उत्पादन निघत नव्हते तेथे दोन वर्षापासून एकरी 60 ते 70 टन ऊस उत्पादन येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अतिशय चांगल्या पद्धतीने आलेल्या उसाचे प्लॉटही पाहून मान्यवरांनी कौतुक केले. कारखाना कार्यस्थळावरील सर्व विभागांसह सहकारी तत्वावरील श्री दत्त भांडार आणि झुणका भाकर केंद्रालाही त्यांनी भेट दिली.
यानंतर सौ.अस्मिता सतीश पाटील यांच्या कोंडीग्रे येथील शेत जमिनी मध्ये 0265 तसेच को 86032 या प्रत्येकी पाच एकर क्षेत्राच्या 150 टन स्पर्धा प्लॉटला आणि तीन एकर मधील टिश्यू कल्चर ऊस बियाणे प्लॉटलाही त्यांनी भेट दिली. 13007 या ऊस जातीचे सुपर केन नर्सरी चे आधुनिक तंत्रज्ञान पाहून ते भारावून गेले. तसेच आंबा आणि हळद पिकविलेल्या ठिकाणाला त्यांनी भेट दिली. गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेले विविध प्रयोग आणि क्षारपड मुक्तीचे काम उल्लेखनीय असून याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होऊन त्यांची आर्थिक समृद्धी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आणि अशा कामाची गरज सर्वच शेतकऱ्यांना असून व्ही.एस.आय. च्या माध्यमातून सर्व सहकार्य करण्याची त्यांनी ग्वाही दिली. यावेळी संचालक भैय्यासाहेब पाटील यांच्यासह दत्त कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.