![]()
चंदगड : प्रतिनिधी

शक्तिपीठ महामार्ग चंदगड तालुक्यातून नेण्याच्या हालचालींना स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असून, यासंदर्भात ऍड. संतोष लक्ष्मण मळवीकर व चंदगड तालुक्यातील अनेक ग्रामस्थांनी तहसीलदार, चंदगड यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले. चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनीच या महामार्गाची तालुक्यातून मागणी केली असून, त्यामुळे पर्यावरण आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. या प्रकल्पामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार असून, नद्यांचे प्रवाह बाधित होतील. चंदगडचा बराचसा भाग ‘इको सेंसिटिव्ह झोन’ मध्ये मोडतो, त्यामुळे जैवविविधता आणि वन्यजीवांच्या अस्तित्वावर संकटाची भीती आहे.
ऍड. मळवीकर यांनी यावेळी सांगितले की, “या महामार्गामुळे जर चंदगड तालुक्याचे नुकसान होत असेल, तर कोणत्याही परिस्थितीत तो प्रकल्प मान्य केला जाणार नाही. आम्ही वेळप्रसंगी ए.व्ही.एच. प्रकल्पाप्रमाणे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू. रक्त सांडले जाईल पण हा महामार्ग चंदगड तालुक्यातून होऊ दिला जाणार नाही.” तसेच, शासनाने जर प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर बळाचा वापर केला, तर त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या बिघाडाला संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल, असा ठाम इशारा दिला आहे.
या निवेदनावर ऍड. मळवीकर यांच्यासह सुनील नाडगौडा, दत्तू रामू पेडणेकर, धोंडीबा पाटील, यल्लाप्पा जोशी, जयवंत घोळसे, बाळू दरेकर, विष्णू चांदेकर, सूर्याजी पाटील, मारुती कुत्रे, धर्मा जाधव, ज्योतिबा पवार, सचिन पाटील, सचिन देसाई यांच्या सह्या आहेत.
