ॲलोपॅथी डॉक्टरांवर अन्याय करणारा निर्णय शासनाने रद्द करावा

Loading

आजरा इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी

आजरा / प्रतिनिधी

महाराष्ट्र मेडिकल कौन्सील (एम.एम.सी.) ही ॲलोपॅथी पदवी प्राप्त असणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी व नियंत्रण करणारी संस्था आहे. तरीसुद्धा होमिओपॅथी चिकित्सा करणाऱ्या डॉक्टरांना एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स ऑफ मॉडर्न फार्मेकोलॉजि हा कोर्स सुरु करून त्यांना एम. एम. सी. ची नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय साडेपाच वर्षे व त्या पुढील शिक्षण घेतलेल्या ॲलोपॅथी डॉक्टरांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे हा निर्णय शासनाने रद्द करावा असे निवेदन आजरा इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे आजऱ्याचे नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांना देण्यात आले आहे.

होमिओपॅथी आणि आयुर्वेद या वेगळ्या रुग्णचिकित्सा पद्धती असून त्यांची औषध योजना व उपचार पद्धती ॲलोपॅथी पेक्षा वेगळ्या आहेत. या शाखामधील डॉक्टरांना त्यांच्या त्यांच्या पॅथी प्रमाणे नोंदणी करण्यासाठी होमिओपॅथी आणि आयुर्वेद या वेगवेगळ्या संस्था आहेत. त्याप्रमाणे त्यांची नोंदणी होत असते. याचा विरोध इंडियन मेडिकल असोसिएशनने कधीही केलेला नाही. परंतु होमिओपॅथी शिकलेल्या डॉक्टरांना ॲलोपॅथी औषधे वापरता यावीत म्हणून महाराष्ट्र शासनाने सर्टिफिकेट कोर्स ऑफ मॉडर्न फार्मेकॉलॉजी हा एक वर्षाचा कोर्स सुरु केला आहे. वास्तवीक ॲलोपॅथी मधील फार्मेकॉलॉजी हा विषय दीड वर्षे शिकवला जातो व संपूर्ण अभ्यासक्रमात त्याचा मेडिसिन सर्जरी गायनॅकॉलॉजी या विषयांबरोबर कायम संदर्भ येत रहातो. असे असताना आठवड्यातून दोन-तीन दिवस फार्मेकॉलोजी शिकवून होमिओपॅथी डॉक्टरांना एम.एम सी.ने दि. 30/06/2025च्या परिपत्रकाद्वारे नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गोष्ट साडेपाच वर्षे व त्या पुढील उच्च शिक्षण घेतलेल्या ॲलोपॅथी डॉक्टरांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे एम.एम.सी. ने घेतलेला निर्णय शासनाने रद्द करावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन आजरा आय.एम.ए.ने तहसीलदार यांना दिले.

यावेळी डॉ.दीपक सातोसकर (प्रेसिडेंट आय. एम.ए.), डॉ. रविंद्र गुरव (व्हा. प्रेसिडेंट ),डॉ. अनिल देशपांडे (सेक्रेटरी ), डॉ. कुलदीप देसाई (ट्रेझरर), डॉ.अनिकेत मगदूम आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *