हिंगणगाव दुहेरी खुनाने हदरले : परिसरात खळबळ

वृद्धबापासह लहान भाऊ रक्ताच्या थारोळ्यात

हातकणंगले : प्रतिनिधी

हिंगणगाव ता. हातकणंगले येथे घरगुती वादाचे पर्यावसन रक्ताच्या नात्यांच्या अंगावर धावून जाण्यात झाल्याची धक्कादायक घटना २९ मार्च रोजी घडली. किरकोळ वादातून मुलाने आपल्या वृद्ध वडिलांसह धाकट्या भावाचा कुऱ्हाड आणि खोऱ्याने वार करून निर्घृण खून केला. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, हिंगणगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

मारुती बंडू कुंडले (वय ६५) आणि शीतल मारुती कुंडले (वय ४५) अशी मृतांची नावे असून, आरोपी संभाजी मारुती कुंडले (वय ४८) याने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंडले कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून कोणत्यातरी कारणावरून वाद होत असल्याची माहिती घटनास्थळी सुरू होती. रविवारी दुपारी ३ ते ४ च्या सुमारास आरोपी संभाजी याचा त्याचे वडील मारुती आणि भाऊ शीतल यांच्याशी शेतातील विहिरीजवळ पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात संभाजीने जवळच असलेले कुऱ्हाड आणि खोरे उपसून दोघांवरही सपासप वार केले. या हल्ल्यात मारुती आणि शीतल हे दोघेही जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर एका अज्ञात व्यक्तीने पोलीस पाटील परवीन मुजावर यांना फोन करून घटनेची माहिती दिली. मुजावर यांनी तातडीने खातरजमा करून हातकणंगले पोलीस ठाण्याला पाचारण केले. माहिती मिळताच एपीआय पल्लवी यादव, पीएसआय नानासो पवार, हवालदार भोसले आणि पोलीस कॉन्स्टेबल गस्ते यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आरोपी संभाजीने स्वतःहून पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले.

घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच हिंगणगावमधील ग्रामस्थांनी शेतात मोठी गर्दी केली होती. सरपंच दीपक पाटील आणि इतर प्रतिष्ठित नागरिकही घटनास्थळी उपस्थित होते. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे.

सख्ख्या मुलानेच बापाचा आणि भावाचा जीव घेतल्याने हिंगणगावात हळहळ व्यक्त होत आहे. शेतीच्या वादातून किंवा अन्य घरगुती कारणातून हे हत्याकांड घडले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी हातकणंगले पोलीस अधिक तपास करत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.