सहा नगरसेवकांचा कायदेशीर लढ्याचा इशारा; सिद्धेश्वर यात्रेतील व्यवहारांवर प्रश्नचिन्ह
जयसिंगपूर : प्रतिनिधी
जयसिंगपूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेत उभारण्यात येणाऱ्या पाळण्यांचे दर कमी करावेत, अशी मागणी शिरोळ तालुका विकास आघाडीच्या सहा नगरसेवकांनी केली होती. मात्र सत्तेच्या जोरावर ही मागणी सिद्धराज देवालय ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी धुडकावून लावल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. याबाबत बुधवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगरसेवकांनी ट्रस्टच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
यासंदर्भात पुढील काळात कायदेशीर लढा उभारण्याचा इशाराही नगरसेवकांनी दिला. सिद्धेश्वर यात्रेत उभारण्यात येणाऱ्या पाळणे व स्टॉल संदर्भात बेकायदेशीर उभारणी, अनधिकृत आर्थिक व्यवहार, सुरक्षेचा अभाव आणि शासनाच्या महसुलीचे नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सहा नगरसेवकांनी यापूर्वीच पोलिस प्रशासनाकडे तक्रार केली होती. पोलीस अधीक्षक, जयसिंगपूर विभागीय पोलीस उपाधीक्षक तसेच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत या प्रकरणात फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, या विषयावर पुढील पाऊल म्हणून बुधवारी जिल्हाधिकारी तसेच धर्मादाय आयुक्त यांच्याकडेही निवेदनाद्वारे तक्रार दाखल केल्याची माहिती नगरसेवकांनी दिली.
नगरसेवकांनी सांगितले की, मंगळवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांच्या मध्यस्थीने सिद्धराज देवालय ट्रस्टचे अध्यक्ष शामराव बंडगर, ट्रस्टी संभाजी मोरे, राजेंद्र दाईंगडे आणि अमरसिंह निकम यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत पाळण्यांच्या दराबाबत बुधवारी सकाळी निर्णय देऊ, असे आश्वासन ट्रस्टकडून देण्यात आले होते. त्याचवेळी संभाजी मोरे यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी दूरध्वनीवरूनही चर्चा करून दिली होती. मात्र अखेरीस पाळण्यांचे दर कमी होणार नाहीत, असे स्पष्ट सांगत ट्रस्टने नागरिकांच्या मागणीला नकार दिल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सिद्धेश्वर देवाची यात्रा सुरू झाली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांना न्याय मिळावा आणि यात्रेत होणाऱ्या व्यवहारांबाबत पारदर्शकता राहावी, या उद्देशाने आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता, असे नगरसेवकांनी स्पष्ट केले. पाळण्यांचे दर, यात्रेतील विविध परवाने तसेच अन्य आर्थिक व्यवहाराबाबत नागरिकांना माहिती मिळावी, हा शिरोळ तालुका विकास आघाडीचा प्रामाणिक प्रयत्न होता; मात्र ट्रस्टकडून आमची मागणी धुडकावण्यात आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
या प्रकारच्या गैरव्यवहाराविरोधात आमचा न्यायालयीन लढा पुढेही सुरू राहील, असा इशारा देत नगरसेवकांनी आता महागड्या पाळण्यात बसायचे की नाही हा निर्णय शहरवासी यांनी घ्यावा, असे आवाहन केले. तसेच सिद्धेश्वर यात्रा ही धार्मिक परंपरेनुसार आणि भक्तिभावाच्या वातावरणात सुरू राहील. भाविकांनी नेहमीप्रमाणे दर्शन घेऊन आपली श्रद्धा अढळ ठेवावी, असे आवाहनही करण्यात आले.
या पत्रकार परिषदेस शिरोळ तालुका विकास आघाडीचे पक्ष प्रतोद संजय पाटील कोथळीकर, नगरसेवक संतोष जाधव, नगरसेविका सौ. अनिता कोळेकर, नगरसेवक रंगराव पवार, पंकज गुरव आणि गुंडाप्पा पवार उपस्थित होते.

