जयसिंगपूर : pratini
शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती येथील ‘पुस्तकांचे घर’ या उपक्रमाचे संकल्पक आणि महाराष्ट्रभर वाचन चळवळ राबविणारे कवी डॉ. सुनील दादा पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर रचलेल्या सर्वात प्रदीर्घ मराठी कवितेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्, ग्लोबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् आणि ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डस् या आंतरराष्ट्रीय विक्रम संस्थांकडून करण्यात आली आहे. या उल्लेखनीय यशामुळे धरणगुत्ती गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
डॉ. सुनील दादा पाटील (जन्म – ३१ डिसेंबर १९७७) हे लेखक, मुद्रक आणि प्रकाशक म्हणून ओळखले जातात. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित मराठीतील सर्वात प्रदीर्घ कविता लिहिली असून या काव्यात सुमारे ३०,००० शब्द, ७,२०० ओळी आणि १,८०० कडवी आहेत. त्यांच्या या विलक्षण साहित्यकृतीचे नाव ‘शिवरायांचे महाकाव्य’ असे आहे.
या मराठी महाकाव्याच्या लेखनासाठी नाशिक येथील सौ. कविता ऐनाथ पेन्शनवार यांनी प्रेरणा व मार्गदर्शन दिले. जयसिंगपूर येथील कवितासागर प्रकाशन संस्थेने २७ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘शिवरायांचे महाकाव्य’ हा काव्य विषयक ग्रंथ छापील स्वरुपात प्रकाशित केला.
डॉ. सुनील दादा पाटील हे आंतरराष्ट्रीय स्तरावर परिचित असलेले प्रतिष्ठित लेखक व अनुवादक आहेत. त्यांनी विविध विषयांवर अनेक पुस्तकांचे लेखन, संपादन आणि अनुवाद केले आहे. मराठी साहित्यात संपादन व अनुवाद क्षेत्रात कार्य करणार्या मान्यवर साहित्यिकांमध्ये त्यांची गणना होते. विविध भाषा आणि विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले असून मराठी तसेच भारतीय साहित्य समृद्ध करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. विविध नियतकालिकांच्या पुरवण्यांमधून त्यांनी अनेक विषयांवर नियमित सदरलेखनही केले आहे. गेल्या तीन दशकांपासून विविध वाङ्मयप्रकारांमध्ये त्यांनी सातत्याने मौलिक आणि दर्जेदार साहित्यनिर्मिती केली आहे.
‘शिवरायांचे महाकाव्य’ या अद्वितीय मराठी काव्य विषयक ग्रंथाला १९ फेब्रुवारी २०२६ रोजी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्, ग्लोबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् आणि ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डस् या संस्थांकडून जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. काही कारणास्तव डॉ. सुनील दादा पाटील यांना मुंबई येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून हे प्रमाणपत्र स्वीकारता आले नाही. त्यामुळे दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या हस्ते शिरोळ येथे त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी त्यांच्या पत्नी सौ. संजीवनी सुनील पाटील तसेच बालसाहित्यिक प्रिन्स सुनील पाटील, माजी सरपंच शेखर कलगोंडा पाटील, पत्रकार दगडू माने, कार्यकारी संपादक संजय आप्पासो सुतार इत्यादि उपस्थित होते. डॉ. सुनील दादा पाटील यांच्या या साहित्यिक आणि नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
