![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात क्षारपड शेती असल्याने शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर जिप्सम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर कृषिमंत्री भरणे यांनी कृषी विभागाला १०० टक्के अनुदानावर जिप्सम उपलब्ध करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच शिरोळ तालुक्याबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर जिप्सम उपलब्ध होण्याची आशा पल्लवीत झाल्या आहेत.
शिरोळ तालुक्यात पाण्याच्या अतिवापरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर क्षारीकरण झाले आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण घटल्याने उत्पादनक्षमता कमी होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तालुक्यातील अनेक गावे क्षारपड समस्येने ग्रस्त असून जमिनीची सुपीकता पूर्ववत करण्यासाठी जिप्समचा वापर अत्यावश्यक ठरतो. तज्ज्ञांच्या मते, एक एकर क्षेत्रासाठी सुमारे ७ ते ८ टन जिप्समची आवश्यकता भासते.
मात्र जिप्समवर पूर्ण अनुदान नसल्यामुळे हा खर्च शेतकऱ्यांसाठी परवडणारा नाही. त्यामुळे अनेक शेतकरी जिप्समचा वापर टाळत होते, परिणामी जमिनीची गुणवत्ता अधिकच खालावत होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार यड्रावकर यांनी कृषिमंत्र्यांकडे निवेदन देत शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर जिप्सम उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी वारंवार मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला होता.
या प्रयत्नांची दखल घेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित कृषी विभागाला १०० टक्के अनुदानावर जिप्सम उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर शिरोळ तालुक्याबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून क्षारपड जमिनी सुधारण्यास गती मिळणार आहे.

