जयसिंगपूरात २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय शुटिंगबॉल स्पर्धा

Loading

१६ पुरुष, ६ महिला संघांचा सहभाग; ५१ हजारांचे प्रथम पारितोषिक

जयसिंगपूर : प्रतिनिधी

जयसिंगपूर नगरपरिषदेच्या वतीने दिनांक २०, २१ व २२ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय शुटिंगबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, राजेंद्र नांद्रेकर व अमरसिंह निकम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

शुटिंगबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व अमॅच्युअर शुटिंगबॉल असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या मान्यतेने जयसिंगपूर पालिकेसमोरील विक्रमसिंह क्रीडांगणावर या स्पर्धा होणार असून, जयसिंगपूर शुटिंगबॉल क्लब व विक्रमसिंह क्रीडांगण ट्रस्ट यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले आहे.

जयसिंगपूर हे ‘हॉलीबॉल पंढरी’ म्हणून ओळखले जाते. शहराला हॉलीबॉल व शुटिंगबॉल स्पर्धांची समृद्ध परंपरा आहे. दरवर्षी २६ जानेवारी रोजी होणाऱ्या शुटिंगबॉल स्पर्धांची परंपरा काही काळ खंडित झाली होती. मात्र यावर्षीपासून ही परंपरा पुन्हा सुरू करण्यात येत असून, यापुढे दरवर्षी २६ जानेवारीला स्पर्धा घेण्यात येतील,असे नगराध्यक्ष यड्रावकर यांनी सांगितले.

यावर्षीच्या स्पर्धेत पुरुषांचे १६ तर महिलांचे ६ संघ सहभागी होणार आहेत. उत्तर प्रदेशचे अरुणकुमार, हरियाणाचे सुरेशकुमार यांच्यासह मित्तल, सिद्धू यांसारख्या नामवंत खेळाडूंचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. २० फेब्रुवारी रोजी उद्घाटनानंतर महिला संघांचे सामने खेळविण्यात येणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्या संघांना अनुक्रमे ५१ हजार, ४१ हजार व २१ हजार रुपये, तर ५ ते ८ क्रमांकाच्या संघांना प्रत्येकी ११ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच मॅन ऑफ द टूर्नामेंट, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट शूटर, बेस्ट पंचमन, बेस्ट डिफेन्सर यांसह वैयक्तिक बक्षिसेही देण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होणार असून, २२ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शुटिंगबॉल स्पर्धा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसारच हे सामने होत असल्याची माहिती माजी नगरसेवक राजेंद्र झेले यांनी दिली.

पत्रकार परिषदेस उपनगराध्यक्ष अनुराधा आडके, नगरसेवक शितल गतारे, बजरंग खामकर, आजी-माजी नगरसेवक तसेच शुटिंगबॉल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.