घोडावत कन्या महाविद्यालय आणि विविध इस्लामिक विद्यापीठे यांच्यात सामंजस्य करार

Loading

जागतिक व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार

जयसिंगपूर : प्रतिनिधी

येथील श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय आणि इंडोनेशियातील शरीफ हिदायतुल्लाह स्टेट इस्लामिक विद्यापीठ जकार्ता, इंडोनेशिया यांच्यात शैक्षणिक व संशोधन सहकार्याबाबत सामंजस्य करार (MoU) नुकताच करण्यात आला. जागतिक व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दृष्टीने हा करार महत्त्वाचा ठरेल असा विश्वास याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. या करारावर महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य प्रो डॉ. विकास मिणचेकर यांनी, तर इंडोनेशियातील विद्यापीठाच्या वतीने प्रो डॉ. युफी अद्रियानी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. प्रो युफी या जयसिंगपूर येथील कन्या महाविद्यालयाच्या वतीने लट्ठे एजुकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत बीजभाषक म्हणून त्या उपस्थित होत्या.

या कराराअंतर्गत दोन्ही संस्थांमध्ये पुढील क्षेत्रांत सहकार्य केले जाणार असून विद्यार्थी व प्राध्यापकांची देवाणघेवाण, संयुक्त संशोधन प्रकल्प, आंतरराष्ट्रीय परिसंवाद व कार्यशाळांचे आयोजन, शैक्षणिक साहित्याची देवाणघेवाण, ऑनलाईन व्याख्याने, तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो (डॉ.) विकास मिणचेकर यांनी सांगितले की,“हा सामंजस्य करार महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामीण व भागातील मुलींना जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे महाविद्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट असून इंडोनेशियातील नामांकित विद्यापीठाशी झालेला हा करार विद्यार्थिनींसाठी नवी दालने उघडणारा ठरेल.” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. तर प्रो . डॉ. युफी अद्रियानी यांनी देखील या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
“भारत आणि इंडोनेशिया या दोन्ही देशांची सांस्कृतिक व शैक्षणिक परंपरा समृद्ध आहे. या करारामुळे दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांना एकमेकांच्या शैक्षणिक पद्धती, संशोधन दृष्टिकोन आणि सांस्कृतिक मूल्ये जाणून घेण्याची संधी मिळेल.” असे ते म्हणाले.

या सामंजस्य करारामुळे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर हे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक नकाशावर अधिक ठळकपणे स्थान मिळवेल, तसेच विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी नवे शैक्षणिक व संशोधनात्मक क्षितिज खुले होईल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. या करारास लट्ठे एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा शांतीनाथ कांते आणा, मानद सचिव सुहास पाटील आणि स्कुल कमिटीचे चेअरमन मा विनोदभाऊ घोडावत यांचे मार्गदर्शन लाभले.महाविद्यालयाच्या गुणवत्तावृद्धी, जागतिक संपर्क आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक सहकार्याच्या दिशेने हा सामाजिक करार म्हणजे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.