![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या राजर्षी शाहू विकास आघाडीला जाहीर पाठिंबा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महाविकास आघाडीअंतर्गत झालेल्या जागावाटपात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला पूर्णपणे डावलण्यात आल्याने पक्षातील कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी निर्माण झाली होती. महाविकास आघाडीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या घटक पक्षांना जागा दिल्या. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून महाविकास आघाडीबरोबर निष्ठेने काम करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकाही मतदारसंघात संधी देण्यात आली नाही. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सर्वांच्या खांद्याला – खांदा लावून काम केले होते. ज्यावेळेला कार्यकर्त्यांना संधी देण्याची वेळ आली तेव्हा या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत या गटाला डावलल्याने कार्यकर्त्यांच्यात नाराजी होती. या अन्यायकारक जागावाटपामुळे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाने महायुतीच्या राजर्षी शाहू विकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे निवडणुका लढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब भिलवडे, जिल्हा उपाध्यक्ष बी. जी. माने जिल्हा, शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, शिरोळ तालुका युवा अध्यक्ष नागेश कोळी, विशाल जाधव यांच्यासह शरद पवार गटाचे पदाधिकारी तसेच प्रकाश पाटील टाकवडेकर उपस्थित होते.
