![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी
जयसिंगपूर नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच खासदार धैर्यशील माने यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपालिकेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू विकास आघाडीने निर्विवाद सत्ता स्थापन केल्याबद्दल तिन्ही मान्यवरांनी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर व व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, जयसिंगपूर व कुरुंदवाड या शहरांनी विकासाभिमुख आणि अनुभवी नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. नागरी पायाभूत सुविधा, रस्ते,, स्वच्छता व अन्य मूलभूत सुविधांसाठी शासनाकडून आवश्यक निधी व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नगरपालिकांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आरोग्य सेवा बळकट करणे, स्वच्छ शहर अभियान प्रभावीपणे राबवणे तसेच युवक व महिलांसाठी संधी निर्माण करणे या बाबींना प्राधान्य दिले पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना अनुसरून सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी राज्य शासन राजर्षी शाहू विकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले की, या विजयामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ जयसिंगपूर व कुरुंदवाडपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले सहकार्य कायम राहील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी मान्यवरांचे आभार मानले.
या प्रसंगी प्रकाश झेले, आदित्य पाटील यड्रावकर, राहुल बंडगर, प्रकाश लठ्ठे, चेतन चौधरी, राहुल पाटील यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.


