कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अपघात विमा योजनेतून दोन कुटुंबांना दिलासा

Loading

आमदार यड्रावकर यांच्या हस्ते वारसांना प्रत्येकी दोन लाखांचा धनादेश प्रदान

जयसिंगपूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, कोल्हापूर यांच्या वतीने संस्था विकास सेवा संस्थांच्या सभासदांसाठी राबविण्यात येणारी अपघात विमा योजना ही सभासद व त्यांच्या कुटुंबांसाठी आधारवड ठरत असून, या योजनेतून अपघाती निधन झालेल्या दोन सभासदांच्या कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. शिरोळ तालुक्यातील शिरटी व अर्जुनवाड येथील दोन विकास सेवा सोसायट्यांच्या सभासदांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा धनादेश कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

जगोंडा पाटील विकास सेवा सोसायटी, शिरटी येथील सभासद वसंत हुग्गे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या पश्चात वारस म्हणून असलेले डॉ. वैभव हुग्गे यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते अपघात विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन भरत आप्पासो पाटील, व्हाईस चेअरमन धनाजी धोंडीराम भोसले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी पी. एम. मोरे तसेच रणजीत काळे उपस्थित होते.
याचप्रमाणे, श्री हनुमान विकास सेवा सोसायटी, अर्जुनवाड येथील सभासद प्रशांत सूर्यवंशी यांचेही अपघाती निधन झाले होते. त्यांच्या पश्चात वारस म्हणून असलेल्या त्यांच्या पत्नी अमृता सूर्यवंशी यांना अपघात विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. हा धनादेशही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी प्रदीप बाळासाहेब चौगुले सावकार, विशाल विजयराव सूर्यवंशी, चंद्रकांत गंगधर, परसराम बागडी सरकार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी पी. एम. मोरे तसेच सोसायटीचे सचिव अफसरपाशा मुजावर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले की, जिल्हा मध्यवर्ती बँकेची अपघात विमा योजना ही केवळ आर्थिक मदत नसून, कठीण काळात सभासदांच्या कुटुंबांना मानसिक आधार देणारी आहे. सहकार क्षेत्रातून सामान्य सभासदांच्या सुरक्षिततेसाठी अशा योजना अधिक व्यापकपणे राबविण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. अपघातासारख्या दुर्दैवी प्रसंगी कुटुंबावर अचानक येणारा आर्थिक ताण कमी व्हावा, हाच या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.