![]()
कोथळी – समडोळी बंधारा दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ
जयसिंगपूर : प्रतिनिधी
कोथळी – समडोळी बंधाऱ्यामुळे 30 गावांचा नळपाणी पुरवठ्याचा व साडेचार हजार हेक्टर शेतजमिनीचा प्रश्न सुटला आहे. बंधाऱ्याच्या पिलरची मोठी पडझड झाल्याने तसेच बांधकाम कमकुवत होऊन बंधार्यास धोका निर्माण होऊन बंधाऱ्याचे अस्तित्व धोक्यात आले होते. येथील शेतकऱ्यांचा व पिण्याच्या पाण्याचा भविष्यात पाणी प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने येथील शेतकरी व ग्रामस्थ चिंतेत होते. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाठपुरावा करून या बंधाऱ्यासाठी ६ कोटी ७३ लाख रुपयांचा निधीतून या बंधाऱ्याला नव संजीवनी मिळेल असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम (MIIP) अंतर्गत टप्पा-1 मधील वारणा मोठा प्रकल्पांतर्गत
कोल्हापूर पद्धतीचा कोथळी – समडोळी बंधाऱ्यासाठी विशेष दुरुस्ती व विस्तार सुधारणा योजनेच्या निधीतून ६ कोटी ७३ हजारांचा निधी उपलब्ध झाला असून या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर बोलत होते. याप्रसंगी कोथळी दानोळी व समडोळी येथील ग्रामपंचायत पदाधिकारी सह मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, बंधाऱ्याची स्थिती पाहता भविष्यात उद्भवणारा धोका लक्षात घेऊन बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच बंधाऱ्याचे काम गतीने होईल. गेल्या अनेक वर्षापासून हे बंधाऱ्याने या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचा व ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. या मंजूर निधीतून हा बंधारा मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रारंभी स्वागत प्रसंगी बोलताना संजय नांदणे म्हणाले 1972 -73 साली हा बंधारा बांधण्यात आला .लांबी 87 मीटर तर उंची 7 मीटर आहे. बंधार्याची पाणी साठवण क्षमता 6.34 दशलक्ष घनमीटर आहे .कोल्हापूर जिल्ह्यातील तीरावरील कोथळी दानोळी उमळवाड, निमशिरगाव, कवठेसार, कुंभोज, हिंगणगाव, नरंदे, तारदाळ, यड्राव, खोतवाडी पासून ते बुवाचे वाठारापर्यंत अशी १९ गावे तर सांगली जिल्ह्याच्या तीरावरील समडोळी, कवठेपिरान , दुधगाव अशी ११ गावे अवलंबून आहेत. वारंवार येणाऱ्या महापुरामुळे तसेच पिलर चे बांधकाम ढासळल्याने पाणी प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता होती. मात्र आमदार राजेंद्र पाटील यांनी प्रयत्न करून मोठा निधी लावल्याने आणि शेतकऱ्यांसह ३० गावातील नळ पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गे लागला आहे.
आमदार राजेंद्र पाटील यांनी प्रयत्न करून निधी आणल्याबद्दल त्यांचा कोथळी, दानोळी ,समडोळी सह परिसरातील गावांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी दानोळीच्या सरपंच सुनीता वाळकुंजे, उपसरपंच मंगल दळवी, कोथळीचे राजगोंडा पाटील, भीमगोंडा बोरगावे, दिलीप मगदूम, ऋषभ पाटील, समडोळीचे संजय बेले, कुंभोजचे अरुण पाटील, दिलीप पाटील, पोपट पाटील, संगीता बोरचाटे, प्रवीण खोत ,उदय राऊत , पिटू पाराज, विजय दळवी, कोथळीचे नितीन वायदंडे, हिदायत नदाफ, कुमार सुतार, शीतल पाटील , रवी पुजारी, उत्तम तिवडे, कॉन्टॅक्टर अँड इंजिनियर्स संभाजी पाटील, नितीन लाड बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता येसने, उपअभियंता कोळेकर, बंधारा सुपरवायझर पिसे आदींसह नदीच्या दोन्ही बाजूकडील गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

