दत्त नामाचा गजर, भाविकांच्या गर्दीत कुरणेवाडीमध्ये भक्तीमय वातावरणात दत्तजन्मकाळ सोहळा संपन्न

Loading

राधानगरी : अरविंद पाटील

श्री दत्त जयंती निमित्त अखंड दत्त नावाने धामोड पैकी कुरणेवाडी दुमदुमली व दिगंबराच्या अखंड भजनात व श्री गुरुदेव दत्तच्या गजरात येथे भक्तीमय वातावरणात कुरणे परिवाराकडून काल सायंकाळी पाच वाजता दत्तजन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मार्गशीष गुरुवार आणि दत्त जयंतीचा दुग्धशर्करा योग एकाच दिवशी आल्याने दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.दत्त जयंती निमित्त श्री दत्त उंबर झाडाच्या पारावर अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे तीन वाजता काकड आरती, षोडशोपचार पूजा, सकाळी सात ते बारा या वेळेत अनेक भक्तांनी श्रींना पंचामृत अभिषेक पूजा केली. दुपारी साडेबारा वाजता श्रींचे चरण कमलावर महापूजा संपन्न झाली. दुपारी तीन वाजता येथील ब्रह्मवृंदामार्फत पवमान पंचसुतांचे पठण करण्यात आले. ठीक पाच वाजता धार्मिक वातावरणात असंख भाविक व ब्रह्मबंध यांच्या उपस्थितीत विधी व श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. फुलांनी सजवला होता पाळणा जन्म काळासाठी पाळणा विविध फुलांनी आकर्षक सजवण्यात आला होता. उपस्थित भाविकांनी सजवलेल्या पाळण्यावर अबीर गुलाल व फुलांचे मुक्तहस्ताने उधळण केली. जन्मकाळानंतर येथील दत्त मंदिरात पारंपारिक पाळणा गीते व आरत्या म्हणण्यात आल्या व प्रार्थना करण्यात आली. महापूजा नंतर भाविकांना महाप्रसाद वाटण्यात आला. रात्री १० नंतर धूपदीप आरती व पालखी सोहळा संपन्न झाला.