![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी

कोणतेही कर्मकांड नसणारा, वैज्ञानिक असणारा बुद्ध धम्मानेच जगाचे महामंगल होईल, कारण तो मानवकेद्री धम्म आहे. असे प्रतिपादन भंते उपगुप्त महास्थवीर यांनी केले.ते जयसिंगपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ आयोजित 35 व्या अखिल भारतीय बौद्ध धर्म महापरिषदेत अध्यक्ष म्हणून बोलत होते.
अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत बुद्धांनी दिलेला धम्म आजही जगाला तारक असाच आहे आज आपण सहज म्हणतो की बाबासाहेबांचे अपूर्ण स्वप्न आम्ही पूर्ण करू पण बाबासाहेबांनी कोणतेही स्वप्न अपुरे ठेवले नाही.डॉ. आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉ. आंबेडकरच हवे आहेत.
ते पुढे म्हणाले बौध्द संस्कार मंडळाचे जे संस्थापक सदस्य निर्वाण झाले त्यांनी या विहाराचा पाया घातला. बुद्ध धम्मात खोट्या गोष्टीला वाव नाही अंधश्रद्धेला वाव नाही सम्यक जगणं हेच अपेक्षित आहे. सम्यक दृष्टी,सम्यक प्रज्ञा विकसित करण्याचा धडा धम्म देतो. जिवंत असताना आई-वडिलांची सेवा करा ते गेल्यावर त्यांच्या स्मृतिदिनाला रक्तदान शिबिर आयोजित करून काही फायदा नसतो. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
पू.भ.खेमधम्मो महास्थविर म्हणाले, बौद्ध अनुयायानी जागृत अभ्यास आणि प्रज्ञावंत होऊन बोधगया मुक्ती लढ्यात सहभागी झालं पाहिजे आज भारत एका वेगळ्या वळणावर आहे सारा देश उद्योगपती आणि भांडवलदारांच्या दावणीला बांधला जात असताना सामान्य जगणं मुश्किल होऊन बसले आहे. धम्माचे पालन करून धम्मधर व्हा.
पू.भ. डॉ.सत्यपाल महास्थविर म्हणाले, आज मार्गशीर्ष पौर्णिमा पौर्णिमेला अष्टशिलाचे पालन उपासकांनी करायला हवे त्यांनी दहा पारमिताचे विश्लेषण करून आपण धम्माच्या विसंगत आचरण करू नये अशी भावना चित्तात असावी. धम्माच्या विरोधी आचरण उपवासाकाचे नसावे संकल्प वक धम्माचे आचरण करून धम्माचा संस्कार कुटुंबावर केला तर बुद्ध घराघरात पेरला जाईल.
पू.भ.डॉ.यशकाश्यपायन महास्थविर म्हणाले, मानव मुक्तीचा जाहीरनामा म्हणजे बुद्ध धम्म आणि त्या विचारावर चालणारा महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूर्य जसा जगाला आवश्यक आहे तसाच बुद्ध विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आवश्यक आहेत. बुद्धांचा जोर शब्दावर नसून अर्थावर आहे म्हणून धम्म समजावून घ्या भ्रमातून मुक्त व्हा मानवतेचा महामार्ग म्हणजे पंचशील आहे या पंचशीलाचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे.
प्रारंभी सकाळी शिरोळ पचायत समिती येथून महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करून धम्म ज्योतीचा आगमन धम्म मंचकावरती झालं.
धम्म ध्वजारोहण बोधिवृक्ष वंदना यानंतर दीप प्रज्वलन व बुद्ध पूजा होऊन 35 व्या बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन करण्यात आलं.
स्वागत व प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर धनंजय कर्णिक सर, ठराव वाचन प्राध्यापक डॉक्टर प्रवीण चंदनशिवे सर, आभार प्रदर्शन पी.एस चंदुरे यांनी मांडले तर सूत्रसंचालन श्रीकांत कांबळे यांनी केले.
या धम्म परिषदेला शिरोळ तालुक्याचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, प्राध्यापक सुकुमार कांबळे.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे,जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ,महेंद्र सावंत, पोलीस निरीक्षक हाके यांनी भेट दिली.
यावेळी तथागत संडे धम्म स्कूलच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य केले. आर्या इन्फो सोल्युशन किशोर कांबळे यांनी डिझाईन केलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संस्कार मंडळाची वेबसाईट या परिषदेच्या निमित्ताने सुरू करण्यात आली.
शिवाजी विद्यापीठ पाली विभाग या उपासकांनी पाली गीत व संविधान उद्देशिकेचे पालीतून सुश्राव्य वाचन केले.
पाली पाली भाषेचे अभ्यासक्रम विद्यापीठातून सुरू केल्याबद्दल डॉक्टर श्रीकृष्ण महाजन डायरेक्टर, डॉक्टर दीपा श्रावस्ती एडवोकेट शिवाजी घाटगे, सर्जेराव वडणगेकर कांचन वडणगेेकर यांचा सत्कार करण्यात आला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौध्द संस्कार मंडळ रमाई उपासिका संघ, नालंदा वाचनालय ग्रंथालय प्रबुद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, हे सर्वांनी धम्म परिषद पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.