![]()
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

जयसिंगपूर : प्रतिनिधी
शहरातील मगदूम मळा परिसरात बंद घराचे कडी-कोयंडे उचकटून अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची घटना सोमवारी घडली.या चोरीत सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल असा सुमारे ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पद्मावती अशोक मगदूम (वय ६५, रा. मगदूम मळा, जयसिंगपूर) या आपल्या घराला कुलूप लावून शेतात जळण आणण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, सोमवार दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी साडेअकरा ते साडेबारा या वेळेत अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडे उचकटून आत प्रवेश केला.
घरातील लाकडी व लोखंडी कपाट फोडून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल असा एकूण ६७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी पद्मावती मगदूम यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकाँ बन्ने करीत आहेत