जनावरे खरेदी विक्री व्यापार बंद : आजरा येथे जनावरे व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमुखाने निर्णय 

Loading

आजरा : हसन तकीलदार 

राज्यात पुकारलेल्या जनावरे व्यापाऱ्यांच्या बंदला आजरा येथे जनावरे व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमुखाने जनावरांच्या खरेदी विक्रीचा व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आणि येणाऱ्या काळात जनावरांचे व्यापारी जनावरांचा व्यापार पुढील निर्णयापर्यंत बंद ठेवण्याचे बैठकीत घोषित करण्यात आले. या लढ्याला यशस्वी करण्यासाठी संघटित होऊन संघटना तयार करून सनदशीरपणे लढा देण्याचे ठरले. आजरा तालुक्यातील तसेच आसपासच्या तालुक्यातील शेतीव्यवसाय सांभाळत जनवरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांची आजरा येथे बैठक झाली. तर तथाकथित गो रक्षकांनी अथवा सरकानी ही जनावरे विकत घ्यावीत आणि बाळगावी म्हणजे शेतकऱ्यांचे दुःख कळेल असे मत समीर चांद (शिवसेना उबाठा शहर प्रमुख) यांनी व्यक्त केले. 
स्वागत व प्रास्ताविक समीर चांद (बीजेपी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष ) यांनी केले तरया ठिकाणी सर्वांनी आपली मनोगत व व्यथा मांडल्या. अधिकृत परवानगी असणारी जनावरे खरेदी विक्रीसाठी नेत असताना देखील बाहेरच्या तालुक्यामध्ये काही संघटना या व्यापाऱ्यांना जाणून बुजून लक्ष्य करतात. पोलीस प्रशासनाला चुकीची माहिती देत दबाव आणत कोणताही पुरावा नसताना खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम केले जात आहे. कायद्याने मान्यताप्राप्त जनावरे आणली तरी नाहक त्रास होत आहे असे याठिकाणी सांगण्यात आले.

      यावेळी नंदकुमार नारायण देसाई म्हणाले की, मी आज शेतकरी म्हणूनकाम करतो आणि जोडधंदा म्हणून जनावरांचा धंदा करतो दुभत्या म्हशी, शेतीकामासाठी लागणारी बैलजोडी यांची खरेदी विक्री करतो. परंतु ज्यावेळी अशी जनावरे गाडीतून विकायला जातो त्यावेळी गोहत्येच्या नावाखाली तथाकथीत गोरक्षकांकडून दहशत केली जाते. ही जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचा खोटा आरोप करून पोलिसांच्या ताब्यात देऊन मारहाण करून पैसे काढून घेऊन गुन्हे दाखल केले जातात. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन संघटित होऊन लढा देणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले. तर गणपती शिंदे यांनी बाद झालेली भाकड जनावरे, आटलेली जनावरे, वांझ जाणवरांचं शेतकऱ्यांनी करायचं काय? असा सवालही उपस्थित केला. अशी जनावरे बाळगणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. एकतर सरकारने ही जनावरे खरेदी करावीत नाहीतर आम्हाला खरेदी विक्री करण्यास रोखू नये. माझ्याकडील एक लाखाची म्हैस बाद झाल्यानंतर मी ती ३० हजाराला विकली. मला ३०  हजार तरी मिळाले, पूर्ण नुकसान झाले असते. जर घेणाराच तयार होत नसेल तर आम्ही असली जनावरे विकायची कोणाला? अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

यावेळी आयुब खेडेकर, दिलावर पटेल, मेहताब आगा,शांताराम गुरव यांनीही आपली मनोगत व्यक्त करीत आपल्या व्यथा मांडल्या. जनवारांची खरेदी विक्री पूर्णपणे बंद ठेऊन संघटना तयार करून पूर्ण ताकतीने कायदेशीर व लोकशाही मार्गाने लढा देण्याचे एकमुखी निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी आसिफ दरवाजकर, खुदबुद्दीन तगारे, महंमदहानीफ नेसरीकर, महादेव बोलके, नाझिम पटेल,इरफान पिरखान, खलील बेपारी, नजीर वाडीकर,मोहसीन शिकलगार आदीसह वाहतूकदार व जनावरे व्यापारी उपस्थित होते.
यामध्ये जनावरांची वाहतूक करणाऱ्या गाडी मालकाची वाहने व साहित्य जप्तहोत असल्याने वाहतूक व्यवसाय करणाऱ्यांचे नुकसान होत आहे. एक ते दीड वर्षे वाहने पोलीस स्टेशनमध्ये पडून राहतात, जनावरे जप्त करतात. ती जनावरे कोठे जातात हे आजपर्यँत कोणालामाहित नाही. आम्हाला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत परंतु जी जनावरे अधिकृत आहेत ज्यांची खरेदी विक्री करण्यास परवानगी आहे ती तरी खरेदी विक्री करू द्या. या सरकारचे धोरण शेतकऱ्यांविरोधी आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या शेतकऱ्यांना नेस्तनाबूतआणि बरबाद करण्याचाच हा एक प्रकारचा कट आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन १०० टक्के बंद ठेऊन उपजिविकेसाठी तात्पुरते दुसरे पर्याय निवडावे. असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *